Tuesday, December 1

Vacuum cleaner

पसरलो हॉलभर
सुगंधित स्प्रेच्या वासाबरोबर
म्हणून लक्षात नाही आली कुणाला
मोज्यातली दुर्गंधी.

मित्रानं दाखवली
एकेक खोली
कीचन
कोठेच खिडकी नसलेली
आली ऐकू
एक्झॉस्ट् फॅनची संथ घरघर
कण्हल्यासारखी
ताटंबिटं | ग्लासंबिसं | बशाकप | डबेबिबे
नावं लेबलासहित
व्यवस्थितपणे मांडून फडताळावर.

हॉलमधल्या भिंतीच्या रंगाला
मॅचिंग असलेलं सागवानी फर्निचर
बोन्सायची झाडं | शोभेच्या वस्तू
गणपतीची कलात्मक फ्रेम
एकंदर सगळं छानच.

आपण त्यात मिसमॅच की काय ?
या विचारानं मी एसीकंटेन्ड रूममधे
घामाघूम.

मित्र म्हणाला:
खिडकीतून पाऊस छानच दिसतो
आणि चंद्र
नुकताच पेंट दिलेल्या बंगल्यासारखा. उजळ.

मी जेवलो
सवय नसताना
काटेचमच्यातून
ताटाभोवती खरकटं पडू न देण्याची खबरदारी घेत.

इतपत सर्व ठीक होतं.
मात्र मित्राच्या बायकोनं कपाटातून व्हॅक्युमक्लीनर काढला
तेव्हा
लटपटलोच
निघालो घाई-घाई करत फ्लॅटबाहेर
वाटलं आता ओढला जाईन की काय ?
फोलपटासारखा
फरशीवरल्या धुळीबरोबर.

No comments:

Post a Comment